लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु।। : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या विहिरीवरील मोटारपंपाचे रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळल्यानंतर १० दिवस पाणी पुरवठा ठप्प होता. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात १८ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच महावितरणने १९ जानेवारीला याठिकाणी नवे रोहित्र बसवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पायपीट थांबली आहे. काजळेश्वर येथील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शासकीय विहिरीवर मोटारपंप बसवला आहे. या मोटारपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी बसविलेले रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळल्यानंतर पाणी पुरवठा योजना ठप्प झाली. परिणामी ग्रामस्थांना पायपीट करत शिवारातून पाणी आणावे लागत होते. त्यात काहीजण बैलगाडीने, ट्रॅक्टरने, रिक्षाने पाणी आणत गरज भागवत होते. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत ‘लोकमत’ने १८ जानेवारीच्या अंकात ‘काजळेश्वरवासियांची पाण्यासाठी भटकंती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत महावितरणने १९ जानेवारी रोजीच येथे नवे रोहित्र बसवले. पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
===Photopath===
210121\21wsm_4_21012021_35.jpg
===Caption===
पाणी पुरवठयाच्या मोटारपंपासाठी मिळाले नवे रोहित्र