वाशिम: यंदाच्या हंगामातील सोयाबीनची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे घरात साठवलेले जुने सोयाबीन विकण्याची लगबग शेतकऱ्यांनी सरू केल्याने बाजारात नव्या हंगामाच्या तोंडावर जुन्या सोयाबीनची विक्रमी आवक होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३ लाख ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर गत हंगामातही २ लाख ९८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि, दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले.
आता नव्या हंगामातील सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. पावसाने सद्यस्थितीत उघाडी दिली असली तरी, पुढे पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी नव्या सोयाबीनच्या काढणीची लगबग सुरू केली आहे. त्यात नव्या सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने या शेतमालास अपेक्षीत दर मिळणार नाही. त्यात साठवण्याची अडचण असल्याने शेतकऱ्यांनी घरात साठवलेले जुने सोयाबीन विक्रीस काढले. यामुळे बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांत मिळून २० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक झाली होती. त्यात जुने सोयाबीन ८० टक्क्यांच्यावर होते.
नव्या हंगामानंतर दरावर परिणामयंदाच्या हंगामातील सोयाबीन काढणीवर असून, अनेक शेतकरी नवे सोयाबीन विक्रीसही काढत आहे. येत्या काळात सोयाबीनची आवक आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. आवक वाढत असल्याने जुन्या सोयाबीनच्या दरावर मात्र परिणाम होत आहे. येत्या काळात सोयाबीनचे दर अधिकच घसरण्याची शक्यता त्यामुळे वाढणार आहे.
कोणत्या बाजार समितीत किती आवक (क्विंटल)वाशिम - ६५००कारंजा - ५५००मंगरुळपीर - २०००रिसोड - २५००मानोरा - १०००