लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : केवळ निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत. निविदा प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली, याचा उलगडा होउ शकला नाही.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून रिसोड नगर परिषदेने एका वर्षापूर्वी १४ घंटागाड्या खरेदी केल्या. परंतू, मागील एका वर्षापासून या घंटागाड्या जागेवरच आहेत. यामुळे ५० लाखांची गुंतवणूक तुर्तास तरी व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते. नगरपरिषदेच्या या नवीन घंटागाड्या स्वमालकीच्या असतानाही अमरावतीच्या कंत्राटदाराच्या घंटागाड्या कार्यरत आहेत. अमरावतीच्या कंत्राटदाराची मुदत होऊनसुद्धा पुन्हा नुतनीकरण करण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या नाहीत. नगर परिषदेला या आपल्या मालकी हक्काचा घंटागाड्याचा कोणत्याही प्रकारे विनियोग करता येत नसल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला त्याच्या वाहनांचे दरमहा भाडे द्यावे लागत आहे. यामुळे नगर परिषदेला दुहेरी नुकसान सहन करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नवीन घंटागाड्या वर्षभरापासून जागेवरच असल्याने त्या खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमरावती येथील कंत्राटदाराचे कंत्राटाची मुदत रद्द करून नगरपरिषदने आपल्या स्वमालकीच्या घंटागाडीचा उपयोग करावा आणि पैशाचा अपव्यय टाळावा, अशा प्रतिक्रिया नगरसेवकांमधून उमटत आहेत. यावर नगर परिषद प्रशासन नेमका काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. सदर नवीन घंटागाड्याची निविदा प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. निविदा प्रक्रियेची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात सदर नवीन घंटागाड्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- गणेश पांडेमुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड
निविदेअभावी एका वर्षापासून नवीन घंटागाड्या जागेवरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 11:07 AM