लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोशल मिडीयाच्या या काळात लिहीनाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवसाहित्यीक तयार होत आहेत, ही बाब चांगली असली, तरी नव साहित्यीकांनी त्यांच्या लिखानाचा दर्जा वाढविण्यासाठी वाचन व चिंतनावर भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यीक तथा बालभारतीचे माजी अध्यक्ष ना.चं. कांबळे यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते , प्रसिध्द साहित्यिक, बालभारतीचे माजी अध्यक्ष, नॅशनल बुक्स ट्रस्टचे सदस्य , महाराष्टÑ शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारित्र्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य, ना.चं. कांबळे हे आपल्या लिखाणामुळे महाराष्टÑात ओळखल्या जातात. साहित्य व अभ्यासमंडळ क्षेत्रात विविध भूमिका ते पार पाडत आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद......प्रश्न - वाचनसंस्कृती वाढीसाठी काय करावयास पाहिजे?कांबळे - वाचन संस्कृतीवाढीसाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. मग ते वाचनालयात जावून वाचन असो किंवा शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवरचे वाचन असो. पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेमधून पुस्तके देवून ते वाचन करण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले जायचे, ते पुन्हा करणे गरजेचे आहे. लहान मुलांन कॉमिक्स देवून त्यांना वाचनाकडे वळविता येईल.प्रश्न - नव साहित्यिकांच्या लिखाणाबाबत काय सांगाल?कांबळे - सद्यस्थितीत सर्वच जण साहित्यिक बनले आहेत. उठसुठ वाटेल तो काहीना काही लिखान करुन सोशल मिडीयावर व्हायरल करतोय. मित्र मंडळीकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याने तो स्वत:ला मोठा साहित्यिक समजतोय. वास्तवात तसे नाही. साहित्यिकांचे लिखाण उत्तमच परंतु सोशल मिडीयामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने लिखान कमी झाले असे म्हणता येणार नाही; परंतु वाचक कमी झाले एवढे नक्की!प्रश्न - नवीन साहित्यिकांना काय संदेश द्याल ?कांबळे - नव्यानेच लिहिणाºया साहित्यिकांनी अवश्य लिहावे . लिहिताना आपण लिहिलेले साहित्य उत्तम दजार्चे आहे की नाही हे पडताळावे. नवीन साहित्यीकांनी भरपूर वाचन, चिंतन आणि मनन करणे अंत्यत महत्वाचे आहे. यातील अनुभव मनात रुजविला पाहिजे. त्यातून खरे साहित्य उतरेल जे वाचकांनाही आवडेल यात दुमत नाही.प्रश्न - उत्तम साहित्य घडविण्यासाठी काय करावे ?कांबळे - उत्तम साहित्य लिखान करावयाचे असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे वाचन सर्वात महत्वाचे. त्यांनतर प्रतिष्ठित , ख्यातीप्राप्त साहित्यीकांच्या भेटी घेवून आपले विचार मांडणे . त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी ऐकून त्यावर चिंतन करावे. हे केल्यानंतर आपण किती चांगले साहित्यिक आहोत याची कल्पना आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मिडीयामुळे वाचन वाढले, परंतु साहित्यीक निर्माण करीत असलेल्या साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरविली आहे. हातात मोबाईल घेवून वाटेल तो वाटेल तेथे काहीही वाचन करतांना दिसतोय. साहित्यिक मोठया मेहनतीने, अभ्यासपूर्ण लिखान करतात पण त्याला मोजकेच वाचक मिळताहेत. हे वाचन संस्कृतीसाठी ठिक नाही.