कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याचा भाग उंबर्डा बाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टीला लागून आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास कळपातून भरकटलेल्या एका निलगाईवर इंदिरानगर झोपडपट्टी भागात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. इंदिरानगर झोपडपट्टीतील नागरिक जागे झाल्याने त्यांनी जखमी निलगाईचा बचाव केला.
यावेळी गस्तीवर असलेले उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे पो. काॅ. नितीन पाटील, होमगार्ड अमोल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळाली भेट देऊन वन्य जीव विभागाचे सोमठाणा बीटचे वनरक्षक देवानंद बावनथडे यांना माहिती दिली. बावनथडे यांनीसुद्धा तातडीने घटनास्थळ गाठून वनमजूर गजानन खराटे यांनी जखमी निलगाईला वाहनातून नेऊन सोमठाणा येथे प्रथमोपचार केले.
मात्र, वन्यजीव विभागाचे वनरक्षक देवानंद बावनथडे यांनी निलगाईला वाचविण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ होऊन सकाळी निलगाईचा मृत्यू झाला. यानंतर वन्यजीव विभागाच्या वतीने कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या सोमठाणा बीटमधील फेफरी भागात मृत निलगाईला दफन करण्यात आले .