रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर
रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे.
रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहे. सन २०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. विहिरी व बोअरवेलची जलपातळीदेखील समाधानकारक नव्हती. आता पाणीटंचाई तीव्र बनत असून, याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईदेखील निर्माण झाली असून, चाºयाच्या किंमती वाढत असल्याचे दिसून येते. चारा व पाणीटंचाईचे भावी संकट पाहून काही पशुपालकांनी तर पशूधन विक्रीला काढल्याचे दिसून येते. पाण्यासाठी जनावरांची भटकंती सुरू आहे. प्रकल्पही तळ गाठत असल्याने पशुपालकांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. तालुक्यातील बोरखेडी प्रकल्प, गणेशपूर, हराळ, कोयाळी, मांडवा, धोडप, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी असे नऊ प्रकल्प कोरडेठण्ण आहेत. कोयाळी प्रकल्पात २७ टक्के, नेतन्सा प्रकल्पात १९ टक्के, गौंढाळा प्रकल्पात २७ टक्के, जवळा प्रकल्पात १ टक्के, वरूड बॅरेज २३ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ५४ टक्के, कुकसा प्रकल्पात ३४ टक्के, वाकद प्रकल्पात दोन टक्के असा जलसाठा आहे. सरासरी १४ टक्के जलसाठा असून, येत्या काही दिवसात तालुक्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ तालुका प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा जाहिर केलेला. त्याअनुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येते.