वाशिम : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने, शासनाच्या वतीने काही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. बांधकाम कामगारांना लॉकडाऊनदरम्यान मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य शासनाने केलेली असून, त्यानुसार जिल्ह्यात बांधकाम कामगारांना मदतीचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत नऊ हजार कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. या दरम्यान बांधकाम कामगारांची गैरसोय होऊ नये, त्यांना थोडा-फार दिलासा मिळावा, म्हणून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली. वाशिम जिल्ह्यात जवळपास १९ हजारांच्या आसपास नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. वाशिम जिल्ह्यात जवळपास १९ हजार बांधकाम कामगार हे राज्य शासनाच्या दीड हजार रुपये मदतीस पात्र असून, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदतीचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत नऊ हजारांवर बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात दीड हजारांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
००००
नोंदणी केलेले बांधकाम कामगार १९,४४५
नोंदणी न केलेले बांधकाम कामगार ३,५८०
.......
मदत मिळाली
राज्य शासनाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यानुसार, दीड हजार रुपये मिळाले आहेत. लॉकडाऊन काळात या मदतीचा तेवढाच दिलासा मिळत आहे.
- शे. इमरान
.....
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नाही. त्यामुळे नोंदणी न केलेल्या बांधकाम कामगारांनाही शासनाने दीड हजार रुपयांची मदत करायला हवी. यामुळे नोंदणी नसलेल्या बांधकाम कामगारांनाही दिलासा मिळेल.
- समाधान वानखडे
...............
शासनाने घोषणा केल्यानुसार दीड हजार रुपये मिळाले आहेत. हातावर पोट असल्याने आधीच उदरनिवार्हाचा प्रश्न समोर आहे. सरकारी मदत मिळाल्याने काही प्रमाणात धीर मिळतो.
- रमेश खिल्लारे
—————
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाने दीड हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात मदतीचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत नऊ हजार बांधकाम कामगारांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
- गौरव नालिंदे
सरकारी कामगार अधिकारी, वाशिम.
०००००