वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले खरी; परंतू, स्थानिक प्रशासनाची संमती आणि कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती यामुळे सदर वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. राज्य शासनाने दिलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार राज्यात अनेक ठिकाणी १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. वाशिम जिल्ह्यात मात्र तुर्तास १ जुलैला सदर वर्ग सुरू होणार नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात २६ जूनला शाळा सुरू झाल्या नाहीत. कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार कोरोनामुक्त क्षेत्रातील शाळांमध्ये नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतू, तुर्तास १ जुलैपासून सदर वर्ग सुरू होण्यास पालक, स्थानिक प्रशासन राजी नसल्याने सदर वर्ग १ जुलैलादेखील सुरू होणार नाहीत. जिल्ह्यात माध्यमिकच्या एकूण ३६० शाळा आहेत. सर्वांच्या संमतीतून शाळा सुरू होण्यासाठी शिक्षण विभाग सध्या वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे शाळेच्या वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम अंतिम टप्प्यात पोहचली आहे.
नववी, दहावी, बारावीचे वर्गही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 4:06 PM