वाशिम : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीनी, युवती व महिलांना मानसिक त्रास देणाºया मजनुंचा बंदोबस्त करण्यासाठी २०१५, २०१६ अशा दोन्ही वर्षी वाशिममध्ये निर्भया पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाचे वाहन शाळा-महाविद्यालयीन परिसरात गस्तीवर राहायचे. यामुळे चुकीच्या प्रकारांवर आपसूकच आळा बसला होता. मात्र, यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होवून दीड महिना होत असताना पोलिस प्रशासनाने निर्भया पथक अद्याप गठीत केले नाही. परिणामी, शहरांतर्गत चिडिमारीचा प्रकार फोफावत असल्याचे दिसून येत आहे.
शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी युवती, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने निर्भया पथक तयार करून सोबत वाहन आणि पुरेसा कर्मचारीवर्ग तैनात केला होता. या पथकावर शाळा, महाविद्यालयांसोबतच बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा ठिकाणी जाऊन मुलींची छेड काढणाºयांवर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामुळे महिलांच्या छेडछाडीला बहुतांशी आळा बसला होता. यंदा मात्र ना कुठे निर्भया पथकाचे वाहन दिसत आहे, ना पथक गठीत करण्यात आले आहे. परिणामी, परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून शाळा-महाविद्यालयीन परिसरात मजनुंचा वावर वाढल्याचे पाहावयास मिळत आहे.