नीता लांडे यांचा जन्म कारंजातीलच धनज बु. येथे झाला. नववीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरविल्यानंतर त्यांच्या आईने काबाडकष्ट करून दोन मुली आणि एका मुलाचा सांभाळ केला. त्यातूनच नीता लांडे यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी शेतात राबून शिक्षण घेतले. कारंजा तालुक्यातील तपोवन हे त्यांचे सासर. त्यांना पूर्वीपासूनच पर्यावरणाची आवड होती. लग्नानंतर त्यांना पुण्याला जावे लागले; परंतु पर्यावरणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्या पती आणि तीन मुलांसह पुन्हा तपोवन येथे आल्या. परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी मिळेल ते काम करतानाच पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. त्यातून त्यांनी कारंजात जवळपास तीन हजार झाडे लावली. त्यांचे कार्य पाहून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने त्यांना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदाने सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात गावागावात जाऊन या संस्थेशी अनेक महिलांना जोडत पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम, वसुंधरा अभियान राबविले. त्यामुळे त्यांना वृक्षमित्र पुरस्कार, ग्राहक पंचायतचा हिरकणी पुरस्कार, राज्य शासनाचे वसुंधरा मित्र प्रमाणपत्र, असे पुरस्कार मिळाले.
नीता लांडे यांनी घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:38 AM