पूर्वीप्रमाणे दारोदारी फिरून भीक मागणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झालेली आहे; मात्र रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि मंदिराशेजारी बसून भीक मागणारे वयोवृद्ध महिला-पुरुष आजही दिसून येतात. त्यांचा दिवसभरातून अनेकांशी संबंध येतो. त्यामुळे हा घटकही कोरोनापासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश भिकाऱ्यांकडे आधारकार्ड नाही आणि त्याशिवाय त्यांना लस मिळणार नाही. त्यामुळे हा प्रश्न बिकट झाला आहे.
............................
भिकाऱ्यांची निश्चित आकडेवारी नाही
महानगरांमध्ये तुलनेने भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात राहते. वास्तविक पाहता भीक मागणे व देणे गुन्हा आहे. त्यामुळे ‘भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५८’अंतर्गत भिकारीमुक्त मोहीम राबविण्यात येते. असे असले तरी वाशिम जिल्ह्यात भिकाऱ्यांची निश्चित संख्या किती, याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
................
आधारकार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार?
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्याची सर्वाधिक भीती ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात त्यांचा प्राधान्याने लसीकरणासाठी विचार झाला.
वयोवृद्ध भिकाऱ्यांची वाशिम शहरासह जिल्ह्यातही संख्या अधिक आहे. त्यामुळे ते कोरोनापासून सुरक्षित होणे गरजेचे आहे; मात्र संबंधितांकडे आधारकार्ड नसल्याने आणि ते बंधनकारक असल्याने त्यांचे लसीकरण कसे होणार, हा प्रश्न आहे.
.................
बॉक्स :
मंदिरांजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक
वाशिम शहरात शनि मंदिर, राम मंदिर, बालासाहेब संस्थान, संत गजानन महाराज संस्थान, नारायणबाबा मंदिर, कारंजाचे गुरूमंदिराशेजारी बसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
गत वर्षभरात कोरोना संकटामुळे मंदिरे बंद राहिल्याने भाविकांचे दर्शनासाठी येणे कमी झाले. परिणामी, भिकाऱ्यांना रोख स्वरूपात मिळणारी भीकही बंद झाल्याने त्यांची उपासमार सुरू आहे.
अशात आधारकार्ड नसल्याने त्यांचा लसीकरणासाठीदेखील विचार केला जाणार नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे.
.................
कोट :
दिवसभर भीक मागून पोट भरणाऱ्यांचाही लसीकरणासाठी विचार व्हायला हवा. आरोग्य विभागाने अशा लोकांसाठी वेगळी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
- प्रवीण पट्टेबहादूर, राजरत्न अल्पसंख्याक संस्था, केकतउमरा