लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे नियमित ग्रामसभा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडून गटविकास अधिकाºयांकडे करण्यात येत होत्या. या संदर्भात लोकमतने ६ सप्टेंबर रोजी पार्डी ताड येथे वर्षभरापासून ग्रामसभाच नाही. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी २५ सप्टेंबर रोजी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली; परंतु या प्रकरणी पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. पार्डी येथील ग्रामपंचायतच्या सचिवांनी आॅगस्ट २०१७ मध्ये प्रभार घेतल्यापासून ग्रामसभेचे आयोजन केले नाही, तसेच ते गावात नियमित येत नाहीत. मासिकसभेलाही उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका वर्षात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि गांधी जयंतीला ग्रामसभेचे आयोजन आवश्यक असताना वर्षभरात एकही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळेच गावात तंटामूक्ती अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही, अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून पंचायत समितीचे लक्ष वेधल्यानंतर गटविकास अधिकाºयांनी विस्तार अधिकारी पद्मने यांच्यामार्फत २५ सप्टेंबर रोजी या प्रकाराची चौकशी केली. यावेळी विस्तार अधिकाºयांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव, तसेच पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे, प्रकाश डाळ, बाळू लांभाडे, गणेश जटाळे, दिनकर डाळ, परशराम लांभाडे या ग्रामस्थांचे बयाण नोंदविले. या चौकशीला २ महिने उलटले तरी, कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पंचायत समितीने चौकशीचा केवळ दिखावाच केला काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बयाणात आढळला होता विरोधाभास पार्डी ताड येथील ग्रामसभेबाबत केलेल्या चौकशीदरम्यान ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांसह ग्रामस्थांच्या बयाणात विस्तार अधिकाºयांना विरोधाभासही आढळून आला होता. सचिवांनी १५ आॅगस्ट रोजी त्यांच्याकडे चांभईचा प्रभार असल्याने पार्डी ताड येथे सभा घेतली नसल्याचे; परंतु २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा घेतल्याचे नमूद केले, तर सरपंचांनीही २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे नमूद केले; परंतु पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे या तिन्ही ग्रामस्थांनी २३ आॅगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याचे बयाणात सांगतानाच हजेरी पुस्तकातील स्वाक्षरी आपली नसल्याचेही दोघांनी म्हटले होते.
पार्डी ताड ग्रामपंचायतच्या चौकशीनंतर कारवाई गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:08 PM