वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून, १४ सप्टेंबर रोजी ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजीच नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा होण्यास प्रारंभ झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
मानोरा तालुक्यात २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पोहरादेवी, वसंतनगर, वाई परिसरातील शेकडो हेक्टर शेतातील पिके जमिनदोस्त झाले. काही शेतकऱ्यांची जमिन खरडून गेली तर काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षीत होते. नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याने शासनाकडून निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झाली नव्हती.
याविरोधात गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशीच शेकडो महिला, शेतकरी, नागरिकांनी तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केले. त्याची दखल घेत दुपारी दीड वाजता तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि बँकेत जाऊन निधी वाटपाची यादी अपडेट केली. या आंदोलनात सरपंच विनोद राठोड, अनिल नाईक, उमेश राठोड, गणेश जाधव, श्याम राठोड, गजानन भालेराव, रमेश पवार, राजाराम राठोड, राजू जयस्वाल, शेख नवाब, रेखा वावडे, शेख तनुजाबी, हरिदास जाधव, पृथ्वीराज राठोड आदींसह शेकडो नुकसानग्रस्त नागरिकांनी सहभाग घेतला होता.