वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पर्यटन क्षेत्र म्हणून शिरपूर गाव परिचित आहे. गावची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास झाली आहे. गावाचा विस्तार झपाट्याने वाढलेला आहे आणि वाढतच आहे. विकासकामांतर्गत पूर्वी रस्त्याची कामेसुद्धा झाली. झालेल्या कामाचा दर्जा योग्य नसणे व त्याला खूप दिवस झाल्याने सद्यपरिस्थितीत गावातील प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. गावातील प्रमुख रस्त्याने वाहन चालविणे हे एक कसरतीचे काम ठरत आहे. दुचाकी चालविणे हे त्याहूनही अवघड काम ठरत आहे. पूर्वी काम केलेले सिमेंट रस्ते आज घडीला पुरते नादुरुस्त झाले आहेत. बसस्थानक ते जैन मंदिराकडे जाणारा रस्ता, बसस्थानक ते देवी मंदिराकडे जाणारा रस्ता, पोलीस स्टेशन ते जानगीर महाराज संस्थानकडे जाणारा रस्ता, बसस्थानकाच्या पाठीमागील वॉर्ड नंबर ३ मधील रस्ता, पोलीस स्टेशन ते नगीना मजीत गुजरीकडे जाणारा रस्ता, आठवडी बाजार ते वाॅर्ड नंबर ६ कडे जाणारा रस्ता या प्रमुख रस्त्यांसह गावातील इतर रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ही रस्ता विकासकामे ग्रामपंचायत स्तरावर होणे शक्यच नाही. त्यातच ग्रामपंचायत चा कोट्यवधी रुपयांचा विविध स्वरूपातील जनतेकडे थकबाकी असलेला कर वसूल होत नसल्याने ही कामे ग्रामपंचायतला करणे कठीणच आहे. मोठी लोकसंख्या व मोठा विस्तार असलेल्या शिरपूर येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष निधीची गरज निर्माण झाली आहे. गावामध्ये विविध पक्षांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी असल्याने या मुख्य रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
रस्ते कामासाठी निधीच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:42 AM