लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करणे, आदी उद्देश समोर ठेवून शासनाने १ आॅगस्ट २०१७ पासून सुधारित पद्धतीने महाराष्ट्रात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली; मात्र पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीस बहुतांशी ‘ब्रेक’ लागला असून अनेक गरजू लाभार्थी योजनेपासून अनभिज्ञ असल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आहे, अशा सर्व कुटूंबांकरिता ही योजना लागू असून याअंतर्गत शासनाकडून विविध स्वरूपात लाभ दिले जातात; मात्र योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली संबंधित यंत्रणा पात्र तथा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नसल्याची वस्तूस्थती आहे. या योजनेचे अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त आदिंच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकेने सदर अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेतल्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका अथवा मुख्य सेविकेकडे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणाच कामाकडे दुर्लक्ष करित असल्याने योजनेच्या अंमलबजावणीस ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तद्वतच प्रत्येक अंगणवाडी सेविकेने पाच प्रस्ताव सादर करण्यासंबंधीचे निर्देश मध्यंतरी देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.- नितीन मोहुर्लेउपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम