वाशिम : जिल्ह्यात सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांना जेवन, नाष्टा देण्यासाठी कंत्राट देण्यात आले. काही सेंटरमध्ये जेवन, नाष्टा देण्याची वेळ निश्चित नसल्याने गैरसोय होत असल्याची माहिती रुग्णांकडून मिळत आहे.
जिल्ह्यात दुसºया लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सरकारी कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाºया रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड रुग्णालय व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सवड, वाशिम येथे दोन, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, मालेगाव येथे कोविड केअर सेंटर आहेत. या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येते. रुग्णांसाठी भोजन, नाश्ता मिळावा याकरीता कंत्राट देण्यात आले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान भोजन मिळते तर काही ठिकाणी नियमित वेळेत ११ ते ११.३० वाजतादरम्यान भोजन मिळते. नाश्त्याची वेळही काही ठिकाणी निश्चित नाही. कधी- कधी सकाळी ७ वाजता तर कधी- कधी ९ ते ९.३० वाजतादरम्यान नाश्ता व चहा येतो, असे काही रुग्णांनी सांगितले.
०००००
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर ०८
सध्या दाखल रूग्ण २७५०
००००
वाशिम, कारंजा येथे मिळते सर्वात चांगले जेवन
वाशिम तसेच कारंजा येथील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वात चांगले जेवन मिळते, असा सूर रुग्णांमधून उमटत आहे. कारंजा येथे सकाळच्या सुमारास दर्जेदार नाश्ता, चहा मिळतो. नाश्त्यामध्ये कधी उपमा, शिराही असतो. सकाळी ११.३० ते १२ वाजतादरम्यान जेवन मिळते. वाशिम येथील कोविड केअर सेंटरमध्येही सकाळी ८ वाजतादरम्यान नाश्ता, चहा आणि दुपारी १२ वाजतादरम्यान जेवन मिळते. जेवनाचा दर्जा चांगला असतो. एखाद्या वेळी जेवनाचा दर्जा म्हणावा तसा राहत नाही, असेही कोरोनावर मात करून आलेल्या काही रुग्णांनी सांगितले.
००००
कोविड सेंटर सवड
सवड (ता. रिसोड) येथील कोविड केअर सेंटरमध्ये नाश्ता व जेवनाची वेळ निश्चित नाही. कधी- कधी सकाळी ८ वाजता नाश्ता मिळतो तर कधी- कधी सकाळी ९ ते ९.३० वाजतादरम्यान नाश्ता मिळतो. जेवनाची वेळ १२ ते १.३० वाजतादरम्यान असते. सकाळी ८ वाजतादरम्यान चहा, नाश्ता आणि १२ वाजता जेवन अशी निश्चित वेळ असली तर या वेळेत वरच्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर चहा, नाश्ता व भोजनासाठी येणे सोयीचे होईल, असेही काही रुग्णांनी सांगितले.
०००
कोविड सेंटर मंगरूळपीर
मंगरूळपीर येथील कोविड केअर सेंटरमध्ये नाश्ता, चहा व जेवनाची वेळ कधी निश्चित राहते तर कधी निश्चित राहत नाही. चहा, नाश्ता व भोजन केव्हा तयार होते, यावर वेळ निश्चित राहते. कधी वेळेवर नाश्ता व जेवन मिळते तर कधी नाश्ता व जेवन पोहचविण्यास विलंबही होतो. मात्र, जास्त विलंबही होत नसल्याने रुग्णांच्या जेवन, नाश्त्यासंदर्भात तक्रारी नाहीत.
०००
जिल्हा कोविड सेंटर
जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथील रुग्णांना सकाळी वेळेवर नाश्ता व चहा मिळतो. मात्र, जेवनाची वेळ निश्चित नाही. कधी १२ वाजतादरम्यान तर कधी १ वाजेपर्यंतही जेवन येत नाही. कधी-कधी मात्र सकाळी ११.३० वाजतादरम्यानच जेवन मिळते. जेवनाचा दर्जा मध्यम स्वरुपाचा असतो, असे काही रुग्णांनी सांगितले.
०००००
कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना चहा, नाश्ता व भोजन देण्यासाठी लिलाव पद्धतीने कंत्राट दिले आहेत. आॅगस्ट महिन्यापर्यंत करार आहे. रुग्णांना वेळेवर चहा, नाश्ता व जेवन देण्यात यावे, जेवनाचा दर्जा हा चांगल्या प्रकारे असावा, अशा सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.