लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क किंवा रुमालचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केलेल्या आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयातच अनेकांकडून मास्कचा वापर होत नसून, फिजिकल डिस्टन्सिंगही व्यवस्थित पाळले जात नसल्याचे सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासह रिसोड, मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनोबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जुलै महिन्यात जिल्हा प्रशासनाने दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आॅगस्ट महिन्यात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क किंवा रूमालचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असा सल्ला आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दिला. दुसरीकडे सरकारी रुग्णालय व परिसरातच काहीजण विनामास्क वावरत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळत नसल्याचे २४ आॅगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, रिसोड व मालेगाव ग्रामीण रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दिसून आले.
रुग्णांनी मास्क लावूनच तपासणी कक्षात किंवा रुग्णालयात यावे, याबाबत सूचना दिलेल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनीदेखील मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण भरती आहेत, त्यांना रुग्णालयाकडून मास्क दिले जाते. रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते. कर्मचारीही मास्क वापरतात. मास्कसंदर्भात परत सूचना केल्या जातील.- डॉ. धम्मपाल मोरे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, रिसोड