लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रेल्वे स्थानकाहून इंटरसिटी एक्स्प्रेस यासह इतर पाच ते सहा पूर्णत: आरक्षित रेल्वेगाड्या सुरू आहेत. आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. १ मार्चला दुपारी केलेल्या पाहणीत हा प्रकार आढळला.कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. वाशिमसह आसपासच्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांसोबत मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही कोरोनाने पुन्हा विळख्यात घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने अद्याप पॅसेंजर रेल्वे सुरू केलेली नाही; मात्र, तिरूपती-अमरावती, जम्मू तावी-नांदेड, जयपूर-हैद्राबाद, जयपूर-सिकंदराबाद या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्णत: आरक्षित या नियमांखाली सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. असे असताना कारवाईकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
‘विना मास्क’वर कारवाई नाहीचवाशिम रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी काही जण ‘विना मास्क’ वावरताना दिसून आले. यासह काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. याप्रकरणी पाहणी करून रेल्वे विभागाच्या पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकही बेफिकीर असून कोरोनापासून बचावासाठी पुढाकार घेत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नियमित तोंडाला मास्क परिधान करायला हवा. यासह फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा. यासंबंधी कारवाईचे अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत तसे आदेश असल्यास निश्चितपणे कारवाई सुरू केली जाईल.- महेंद्र उजवे रेल्वेस्थानक अधीक्षक, वाशिम