लोकमत न्यूज नेटवर्ककाजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम पारवा कोव्हर येथील गजानन एकनार नामक शेतकºयाने पपई घेण्याकरीता व्यापारी नसल्याने २५ मे रोजी दोन एकर शेतात नांगर फिरवून पपईची झाडे नष्ट केली. पारवा कोव्हर येथील शेतकरी गजानन रामजी एकनार यांनी मागील वर्षी पारंपारीक शेतीला फाटा देत दोन एकरात पपईची लागवड केली. त्यांना जवळपास एक लाख दहा हजार रुपये खर्च आला. पपईला चांगल्या प्रमाणात फळेही आली. परंतू कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्याच्या सिमा बंद झाल्याने परजिल्ह्यातील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. लॉकडाउनमुळे कारंजा बाजार पेठ बंद असल्याने पपईला कमी दर मिळत असल्याने आणि परजिल्ह्यातून येणारे व्यापारी बंद झाल्याने पंचाईत झाली. लागवड खर्चही वसूल होत नसल्याने पाहून गजानन एकनार यांनी शेवटी या पपईच्या शेतात नांगर फिरविला. जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून, शासनाने मदत करावी अशी मागणी गजानन एकनार यांनी केली.
पपई खरेदीसाठी व्यापारी मिळेना; शेतात फिरविला नांगर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 3:30 PM