यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही - माजी खासदार अनंतराव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:59 IST2019-07-23T14:59:43+5:302019-07-23T14:59:49+5:30
कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र कार्यकर्त्यांसाठी राजकारण व समाजकारण अखंड सुरू ठेवू, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी केली.

यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही - माजी खासदार अनंतराव देशमुख
रिसोड : कोणतेही पद नसतानादेखील २० वर्षांपासून कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला साथ दिली. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र कार्यकर्त्यांसाठी राजकारण व समाजकारण अखंड सुरू ठेवू, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २१ जुलै रोजी करडा येथे समर्थक, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली.
राजकारण, समाजकारणाची पुढील दिशा आणि कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकाऱ्यांची भूमिका या विषयाच्या अनुषंगाने करडा येथे माजी खासदार देशमुख यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. २० वर्षांपासून कोणतेही पद नसतानादेखील केवळ कार्यकर्ते, समर्थकांच्या बळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षातर्फे लढविण्यात आल्या. कार्यकर्त्यांनीदेखील मोलाची साथ दिली. आता यापुढे मी स्वत: कोणतीही निवडणूक लढणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा करून अनंतराव देशमुख यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. स्वत: कोणतीही निवडणूक लढणार नाही; मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पदाधिकारी, नगर परिषद, बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
(तालुका प्रतिनिधी)