वाशिम : कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारातून फसवणुकीच्या घटना अन्यत्र घडत आहेत. केवायसीच्या नावाखाली अन्य जिल्ह्यातही बँक ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सुदैवाने जिल्ह्यात एकाही व्यक्तिची फसवणूक नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असा सल्ला सायबर सेलने दिला आहे.
सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहारातून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत असल्याने सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे. केवायसीसाठी मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे बँकेच्या खात्यातील पैसे गायब करणारी टोळी राज्यात सक्रिय होत आहे. सुदैवाने वाशिम जिल्ह्यात अद्याप अशी घटना घडल्याची नोंद सायबर सेलकडे नाही. परंतु, नागरिकांनी बेसावध राहू नये. संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी केवायसीच्या नावाखाली मोबाईलवर कुणी लिंक पाठविली तर त्याला प्रतिसाद देऊ नये, असा सल्ला सायबर सेलने दिला आहे.
००००
फसवणूक टाळण्यासाठी ही घ्यावी खबरदारी
१. कोणतीही लिंक आल्यास ओपन करू नये. ओपन केल्यास केवायसी कोणतेही डाक्युमेंट माहिती देऊ नये. ओटीपी आल्यास त्याची माहिती देऊ नये.
२. लोन मंजूर म्हणून अनेकजण प्रलोभन देतात. या प्रलोभनाला बळी न पडता फसवणूक टाळावी. एका मिनिटात लोन मंजूर म्हणणाऱ्या वेबसाईट, फोन कॉलला टाळावे म्हणजे फसवणूक होणार नाही.
३. कागदपत्रांची माहिती मागितल्यास आपली फसवणूक होत असल्याचे समजावे. कागदपत्राची माहिती देतांना संबंधित व्यक्ती, वेबसाईट, फोनसंदर्भात शहानिशा केल्यास फसवणूक टळू शकते.
. . . . . . . . .
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
कागदपत्रे देऊन फसवणूक झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांचे फोन बंद होतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. यामुळे गेलेला पैसा परत मिळणे शक्य होत नाही. याकरिता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही शंका आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेलचा सल्लाही घेता येते.
०००००
कोट बॉक्स
वाशिम जिल्ह्यात केवायसीच्या नावाखाली गत दोन वर्षात फसवणुकीचा एकही गुन्हा सायबर सेलकडे दाखल नाही. सायबर सेलकडून यासंदर्भात वेळोवेळी जनजागृती करण्यात येते.
- राजकुमार वाढवे
सायबर सेलप्रमुख, वाशिम
००००००००