वाशिम : स्थानिक अकोला नाका परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल कुणीच घेत नसल्याने परिस्थितीत सुधारणा कशी होईल, असा प्रश्न शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.
अकोला नाका येथून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यासह महाविद्यालयाकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने रस्ता सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. गत एका वर्षापासून अकोला नाकास्थित रस्त्यावर खड्डे पडले असून, अद्याप याची दखल कोणीच घेतली नाही. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे पाणी साचत असल्याने या पाण्यातूनच मार्गक्रमण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. १० दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मित्तेवाड यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, दगड, गोटे, मुरूम टाकून या खड्ड्यांची थातूरमातूर डागडुजी करण्यात आल्याने अपघाताची शक्यता अधिकच बळावली आहे. दगड, गोट्यावरून वाहन स्लीप होण्याचा धोका असल्याने चालकांना अधिक दक्षता घ्यावी लागत आहे. याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
...............
नागरिक काय म्हणतात?
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालविताना गैरसोयीला सामोरे जावे लागते, शिवाय वाहन स्लीप होऊन अपघाताची भीतीही आहे. व्यवस्थितरीत्या खड्डे बुजवून गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा आहे.
- गजानन खुळे, वाशिम
.......
खड्ड्यांमुळे वाहन चालवावे कसे असा प्रश्न पडतो. अकोला नाका येथे मुख्य रस्त्यावर खड्डे असल्याने आणि पाणी साचत असल्याने याकडे संबंधित यंत्रणा लक्ष केव्हा देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
- केशव वैद्य, वाशिम