शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शासनाकडून नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे; परंतु या खरेदीसाठी अद्यापही संबंधित प्रशासनाने कोणतेच नियोजन केले नसल्याने शेतकर्यांना पुढे अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वखार महामंडळाची गोदामे पूर्ण भरलेली असून, केवळ वाशिम येथे २00 टन आणि मंगरुळपीर येथे ४00 टन साठवणुकीची क्षमता उरली आहे. शासनाकडून यंदाच्या खरीपातील उडीद, मूग आणि सोयाबीनची नाफेडमार्फत खरेदी करण्यास हिरवी झेंडी देण्यात आली आणि मालेगाव, मानोरा वगळता इतर चारही तालुक्यात नाफेडमार्फत उडीद, मुगाची खरेदीही सुरू झाली आहे. गतवर्षी विविध शासकीय योजनेंतर्गत झालेल्या शेतमाल खरेदीत विविध अडचणी आल्याने शेतकर्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तसेच शासनाला वारंवार या खरेदीसाठी मुदतवाढही द्यावी लागली. ही बाब लक्षात घेता शासनाने गतवर्षीच स्वतंत्र निर्णय घेऊन शासकीय खरेदीसाठी गोदामे, बारदाणा आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता गतवर्षी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि संबंधित प्रशासनाने यासाठी नियोजन करणे आवश्यक होते; परंतु आता उडीद, मुगाची खरेदी संपत आली तरी, प्रशासनाने सोयाबीनच्या खरेदीसाठी कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलेले सोयाबीन साठविण्याची अडचण निर्माण होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता वाशिम जिल्ह्यात असलेल्या वखार महामंडळाची मालेगाव, रिसोड येथील गोदामे पूर्ण भरली असून, केवळ मंगरुळपीर येथे ४00 टन, तर वाशिम येथील गोदामांत केवळ २00 टन माल साठविण्यापुरती जागा उरली असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी, या पिकाचा पेरा अधिक असल्याने उडीद आणि मुगापेक्षा कित्येक पटीने सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर येणार आहे. हे सोयाबीन खरेदीसाठी संबंधित संस्थांमार्फत शेतकर्यांची नोंदणीही करण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करणेही क्रमप्राप्त आहे. आता यासाठी नियोजनच नसल्याने सोयाबीनची खरेदी मोठय़ा अडचणीत सापडली आहे.
खरेदी केवळ कागदावरच! जिल्ह्यातील वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर आणि कारंजा येथ्२ो नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी उडीद, मुगासह सोयाबीनची खरेदीही करण्याचे निर्देश आहेत; परंतु अद्यापही एकाही केंद्रांत सोयाबीनची मोजणीसुद्धा करण्यात आली नाही. सर्वच केंद्रांत उडीद आणि मुगाची खरेदी करण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांकडे चौकशी केली असता सद्यस्थितीत सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने ते खरेदी करून साठविणे शक्य नसल्याचा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीसाठी जागाच नसल्याने ही खरेदी सुरू होत नसल्याचे दिसत आहे.
आमच्याकडे नाफेडच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी किंवा इतर संबंधित प्रशासनाकडून साठवणुकीसाठी जागा राखीव ठेवण्याच्या सूचना आलेल्या नाहीत. आमच्याकडे वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर आणि वाशिम मिळून ४00 टन माल साठेल एवढीच जागा शिल्लक आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्राप्त होताच नियोजन करण्यात येईल.-एस. आर. अडकमोलविभागीय व्यवस्थापक, म.रा. वखार महामंडळ अमरावती
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची नाफेडमार्फत खरेदी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने ते पाहूनच खरेदी होत आहे. साठवणुकीसाठी जागा नाही हे खरे आहे; परंतु आम्ही या संदर्भात संबंधित वरिष्ठांकडे पत्र पाठवून जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.- बजरंग भाकरेजिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला