२०२०-२१ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील सर्व प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी सूचना करावी, असे निर्देश समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिले. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित राहिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याचा कालावधीसुध्दा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आला आहे. २०१९-२० या वर्षातील प्रलंबित राहिलेल्या वरील प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रीशीप) व इतर योजनांच्या अर्जावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यवाही करावी, अशा सूचनाही वाठ यांनी दिल्या.
००००००००००००००
योजनांपासून वंचित राहिल्यास कारवाई
महाडीबीटी पोर्टलच्या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रीशीप) व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईनव्दारे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून फी वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील, असा इशारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिला.