परिसरातील शेती कसण्यासाठी सालगडी मिळेनात, असे चित्र आहे. शेतमालक सालगड्याच्या शोधात अनेक तांडा वस्ती, आदीवासी,दुर्गम भागामध्ये भ्रमंती करताना दिसत आहेत. परिसरामध्ये शेती व्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व व्यवहार हे शेतीवर अवलंबून असतात. शेतमालक हे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतीमध्ये काम करण्यासाठी व शेतीची राखण करण्यासाठी शेतात सालगडी ठेवण्याच्या लगबगीत असतात. पण सध्याच्या काळात शेतीमध्ये काम करण्यासाठी अनेकजण तयार नाहीत. एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये शेतीचे क्षेत्र जास्त होते,अनेक शेतकरी शेतकामासाठी आपल्या शेतात सालगडी ठेवत असत. गावातील जमीनदार, पाटील, नोकरदार, हे लोक पूर्वी सालगडी ठेवत होते. सालगड्याचे साल हे एक लाख रुपयापर्यंत सध्या पोहचले आहे, त्यामध्ये बोनस म्हणून ज्वारी एक पोते, गहू एक पोते, हरभरा पन्नास किलो, कपड्यासह काही वस्तू देण्याची पद्धत आजही चालू आहे. परंतु आज सालगडी मिळणे कठीण झाले आहे. अनेक बाबींमुळे शेती तोट्यात जाऊ लागली यामुळे बहुतेक शेतकरी सालगडी ठेवण्यास धजावत नाहीत.परंतु क्वचित शेतकरी ज्यांच्याकडे फळबाग, पशुपालन बागायती क्षेत्र जास्त आहे अशा शेतकऱ्यांना सालगडी ठेवल्याशिवाय पर्याय नाही. गुढीपाडव्याच्या आसपास काही सालगड्यांचे साल संपले की शेतकरी दुसऱ्या सालगड्याच्या शोधात असतो. काही असले तरी शेतीतील सालगडी ही पध्दती आता संपुष्टात आली आहे. विज्ञानाने प्रगती केल्यामुळे संपूर्ण शेती ही प्रगत शेतीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शेतामध्ये माणूस मिळणे कठीण झाले आहे. सुधारित शेतीमध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली. सर्व शेतकऱ्यांचा कल सुधारित शेतीकडे असल्यामुळे सालगड्याची ही किंमत वधारली आहे. परंतु कितीही शेती प्रगतिशील झाली तरी मनुष्याशिवाय शेती होणे शक्य नाही. त्यामुळे शेतात सालगडी ठेवणे गरजेचे आहे. शेतात सालगडी मिळत नसल्याचे दीपक सोनुने यांनी सांगितले.
शेतीसाठी ‘सालगडी’ मिळेना; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:39 AM