वाशिम : जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा नुकताच जाहीर करण्यात आला असून, यंदा ६६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण २ हजार ४६५ कोटी २१ लाख रुपयांच्या पतपुरवठ्यात कृषी, शैक्षणिक, गृहकर्जाचे उद्दिष्ट वाढले आहे.
गतवर्षी विविध क्षेत्रासाठी बँकांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत किती उद्दिष्टपूर्ती झाली याचा विचार करून राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या निर्देशानुसार विविध क्षेत्रासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वार्षिक पतपुरवठा तयार करण्यात आला. त्यास जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये प्राथमिक क्षेत्रात कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक लक्षांक ठेवण्यात आला आहे.
खरीप आणि रब्बी हंगामात १ लाख ३५ हजार ९७८ शेतकऱ्यांना १५ कोटी ६० लाख ५ हजार रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. ४५० जणांना १७ कोटी ३५ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज, ९४९ कर्जदारांना १३७ कोटी ८४ लाख रूपये कर्ज वाटपाचे नियोजन आहे. याशिवाय अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी १९३१ जणांना १७९ कोटी ९९ लाख ७ हजार रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.
बिगर प्राथमिक क्षेत्रामध्ये ३३२५ नागरिकांना २ हजार रुपयांचे कर्जवाटप लक्षांक ठेवण्यात आलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत कृषी, शैक्षणिक, गृहकर्जासह अन्य प्राथमिक आणि बिगर प्राथमिक क्षेत्राच्या उद्दिष्टात मोठी वाढ झाली आहे. त्या-त्या बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून, त्यानुसार चालू आर्थिक वर्षात कर्जवाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या क्षेत्रासाठी किती पतपुरवठा?
क्षेत्र--- संख्या--रक्कम (लाखात)
कृषी क्षेत्र (पीककर्जासह)--१४०४४३--१७३००५
लघू व मध्यम उद्योग--५२०७--२००००
शैक्षणिक--४५०--१७३५
गृहकर्ज--९४९--१३७८४
अन्य प्राथमिक क्षेत्र--१९३१--१७९९७
बिगर प्राथमिक क्षेत्र--३३२५--२००००