वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात २४ तास सेवा देऊनही औषध विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांचा लसीकरणासाठी कुठलाच विचार झालेला नाही. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी टाळ्या वाजवून निषेध नोंदविला.यासंदर्भात माहिती देताना केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट यांनी सांगितले की, देशभरात व राज्यातही १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. औषधी विक्रेते व त्यांच्या दुकानांमधील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहणे शक्य झाले आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाईकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत.कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता औषध विक्रेते व त्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप शासनाने लक्ष दिले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत सर्व औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी आपापल्या दुकानांमध्ये टाळ्या वाजवून निषेध नोंदविला. कोरोना काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी औषधी विक्रेते व कर्मचाऱ्यांचा जवळचा संपर्क आला. यामुळे औषध विक्रेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य व कर्मचारीदेखिल कोरोना बाधित झाले. असे असताना शासनाने लसीकरणात प्राधान्य दिले नाही. त्यामुळे ३१ मे रोजी शांततेच्या मार्गाने टाळ्या वाजवून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.- राजेश पाटील शिरसाटजिल्हाध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाशिम
लसीकरणासाठी विचार नाही; औषध विक्रेत्यांनी टाळ्या वाजवून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 7:52 PM