लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी, जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांत अद्याप एक टक्काही उपयुक्त जलसाठा झालेला नाही. त्यात वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील अधिकाधिक प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात १ जून ते ९ जुलैदरम्यान वार्षिक सरासरीच्या ३७.४२ टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण प्रकल्पांच्या पातळीत समाधानकारक वाढ झाल्याने या प्रकल्पांवरील पाणी पुरवठा योजनांना तूर्तास तरी अडचण नसल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात गत दोन वर्षांत पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी झाले. परिणामी प्रकल्पांत पुरेसा साठा झाला नाही. त्यात २०१८ मध्ये अपुऱ्या पावसामुळे ५०० पेक्षा अधिक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गतवर्षी जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रल्कल्पांतील पातळीत वाढ झाली. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले. आता यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पांतील पातळी वाढण्याची शक्यता होती; परंतु ९ जुलैपर्यंतही जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांची पातळी शुन्यावरच आहे. त्यात वाशिम तालुक्यातील एकूण ३६ प्रकल्पांपैकी १० बॅरेज आणि ७ लघू प्रकल्प मिळून १७ प्रकल्प, मंगरुळपीर तालुक्यातील १५ पैकी ५ प्रकल्प, कारंजा तालुक्यातील १६ पैकी चार प्रकल्प, मानोरा तालुक्यातील २५ पैकी ३ प्रकल्प, व मालेगाव तालुक्यातील २३ प्रत्येकी दोन प्रकल्प, तर रिसोड तालुक्यातील १८ पैकी एकाप्रकल्पाची अद्यापही शुन्यावरच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांची पातळी शुन्यावर असताना, २४ प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवर आहे, तर उर्वरित ८० प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा खाली असून, त्यातील २३ प्रकल्पांतही अद्याप १० टक्के उपयुक्त साठा झालेला नाही. अर्थात जिल्ह्यातील १३६ पैकी ५५ प्रकल्पांची स्थिती महिनाभराच्या पावसानंतरही गंभीर असून, पुढील तीन महिन्यांत पडणाºया पावसावरच या प्रकल्पांच्या पातळीतील वाढ अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास या प्रकल्पांत पुरेसा जलसाठा होणार नाही. अशात संबंधित प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. शिवाय यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यताही कमीच राहणार असल्याची भीती आहे.
२४ प्रकल्पांत ५० टक्क्यांवर साठाजिल्ह्यातील १३६ प्र्रकल्पांत मिळून १० जुलै रोजी सरासरी ३५.८० टक्के उपयुक्त साठा असला तरी, यातील २४ लघू प्रकल्पांसह दोन मध्यम प्रकल्पांतील वाढलेल्या पातळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत ही वाढ दिसत आहे. जिल्ह्यातील २४ लघू प्रकल्पांत सद्यस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून, कारंजा तालुक्यातील अडाण व मालेगाव तालुक्यातील सोनल या दोन मध्यम प्रकल्पांतही ५० टक्क्यांहून अधिक उपयुक्त साठा आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी मध्यम प्रकल्पात मात्र सद्यस्थितीत ४०.५२ टक्केच साठा झाला आहे.