वाशिम : ग्रेडर व गोदामाचे नियोजन अद्यापही झाले नसल्याने नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरुवात होऊ शकली नाही. सध्या शेतकऱ्यांना केवळ ह्यटोकनह्ण घेण्यासाठी बोलाविले जात आहे.यावर्षी तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांना ह्यअच्छे दिनह्ण आले. मात्र, शासनाकडून तुरीला समाधानकारक हमीभाव नसल्याने आणि बाजारभावानुसार तुरीची खरेदी होण्याची कोणतीही हमी नसल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाफेड केंद्रावर तुरीला हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी आणली. मात्र, मध्यंतरी शासनाने अचानक नाफेड केंद्रांवर तुरीची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. आता जिल्ह्यातील नाफेड तूर खरेदी केंद्रावरील २२ एप्रिल २०१७ नंतर व २४ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयानुसार सुरू असलेली तूर खरेदी आज रोजी वाशिम व मंगरुळपीर येथील संपली आहे. कारंजा येथील तूर खरेदी एक-दोन दिवसांत व मालेगाव येथील खरेदी चार-पाच दिवसांत संपणार आहे. सदरच्या केंद्रावरील तूर खरेदी संपल्यानंतर मुख्यमंत्री व राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरदेखील नाफेडमार्फत मार्केटींग फेडरेशनकडून तूर खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर १-२ दिवसांत सदर तूर खरेदी करण्याचे नियोजन आहे, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती प्रशासनाला ९ मे रोजी दिले होते. दोन दिवस लोटल्यानंतरही ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाले नाही. परिणामी, शिल्लक असलेली तूर खरेदी करण्याला सुरुवात झाली नाही. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सध्या केवळ ह्यटोकनह्ण दिले जात आहे. या टोकनमध्ये वाहन असल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे वाहनावरील क्रमांकानुसार तुरीचे वजन करावे, त्याची नोंद रजिष्टरमध्ये करावी, शेतकऱ्यांचे नाव आधार कार्ड, ओळखपत्र, ७/१२, पिकपेरा नोंद, इत्यादी माहितीची कागदपत्रे घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या. तालुक्याचे बंधन टाकल्याने आणि मानोरा येथे नाफेडचे खरेदी केंद्र नसल्याने या शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय झाला आहे. नाफेड केंद्रावर तातडीने तूर खरेदी सुरू व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.नाफेड तूर खरेदी लवकरच सुरुवात होईल. मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कारंजा किंवा मंगरूळपीर येथील नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी नेता येईल.- ज्ञानेश्वर खाडे,जिल्हा उपनिबंधक, वाशिम.मंगरूळपीर येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर आणली आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर खरेदी सुरू होईल. मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना कारंजा व मंगरूळपीर येथे तुरीची विक्री करता यावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.- चंद्रकांत ठाकरेसभापती, कृउबास मंगरूळपीर.
नाफेड तूर खरेदीला सुरुवातच नाही !
By admin | Published: May 13, 2017 4:57 AM