वाशिम : स्थानिक नगर परिषदमार्फत मंजूर करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळाला नाही. यामुळे लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडे निधीची मागणी करावी, यासाठी १५ डिसेंबरला लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, वाशिम नगर परिषद अंतर्गत पात्र लाभार्थींना घरकूल मंजूर झाल्यानंतर अनेकांनी घरकुलाचे काम पूर्ण केले. अडीच लाख अनुदानपैकी २ लाख रुपयांचे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अंतिम टप्प्यातील ५० हजारांचे अनुदान अजूनही लाभार्थींना मिळाले नाही. घरकुलाचे काम करण्यासाठी उधारीवर साहित्य घेतले, पैशाची अडचण असल्याने कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र, ५० हजाराचा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थींना कर्ज फेडणे शक्य होईना.
शासनाकडे निधी आला नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरुन घरकुलाचा चौथा हप्ता देण्याकरिता शासन दरबारी निधीची मागणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर भाजपाच्या शहर उपाध्यक्ष अनिल ताजणे, प्रदीप चतुर, आनंद रणबावळे, विलास भालेराव मदर दहिसमुद्र, भिवा सिरसाट, महादेव पट्टेबहादूर, बाबा कांबळे, भिवा खंडारे, उत्तम गायकवाड, देवराव खडसे, शालीग्राम वाघमारे, अशोक पंडित, देविदास तायडे, गजानन वाघमारे, वच्छलाबाई भगत, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.