वाशिम : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेल्या नगरपरिषदेतील कर्मचारीच विनामास्क काम करीत असल्याचे लाेकमतने २६ फेब्रुवारी राेजी केलेल्या पाहणीवरून दिसून आले. विशेष म्हणजे, येथे कामानिमित्त येणारेही नागरिक मास्कचा वापर करताना दिसून आले नाहीत.
काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. वाशिम शहरात नगरपरिषदेच्या वतीने माेठ्या प्रमाणात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईची माेहीमही हाती घेतली आहे. या कारवाईतून हजाराे रुपयांचा दंड वसूल केला. परंतु, ज्या कार्यालयाकडून दंड आकारण्यात येत आहे, त्याच कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करतात का, याची लाेकमतच्या वतीने पाहणी केली असता जवळपास १० टक्के अधिकारी, कर्मचारी विनामास्क दिसून आले. काहींनी मास्क घातलेले असले तरी ते केवळ शाेभेपुरतेही असल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांवर मात्र अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. याकडे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
--------------
१० टक्के कर्मचारी विनामास्क
वाशिम येथील नगरपरिषदेतील अधिकारी- कर्मचारी मास्कचा वापर करतात का, याची पाहणी लाेकमतच्या वतीने करण्यात आली. यामध्ये नगरपरिषदेतील सर्व विभागांची पाहणी केली असता यामध्ये १० टक्के कर्मचारी मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आले. आस्थापना विभाग, विद्युत पुरवठा करणाऱ्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क दिसून आले नाहीत.
-----------
जिल्हाधिकारी शण्मुगराज एस. यांनी दिलेल्या आदेशान्वये विनामास्क फिरणाऱ्यांसह दुकानदार व इतर नागरिकांवर कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेतंर्गत काेणाचीही गय केली जात नाही. नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांनासुध्दा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, काेणी मास्क घालताना आढळून न आल्यास त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल.
- दीपक माेरे
मुख्याधिकारी , नगरपरिषद वाशिम