लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, बँकांकडून शेतकºयांना कर्जवसुलीचा तगादा सुरू झाला आहे. कर्ज वसुलीच्या नोटीस शेतकºयांना मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, केशवनगर येथे १२ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून या प्रकाराचा निषेध नोंदविला.गतवर्षी रिसोड तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने तसेच अन्य निकषात तालुका बसल्याने शासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर केलेला आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत. असे असताना आता एसबीआय शाखा मसला पेनच्यावतीने शेतकºयांना कर्जाच्या वसुलीची नोटीस देण्यात आली. नंदकिशोर कुंडलिक तहकीक या शेतकºयाला कर्ज वसुलीची नोटीस आली तसेच गारपिटीची जमा झालेली रक्कम असो की दुष्काळ मदत निधीची रक्कम असो, त्या खात्याला ‘होल्ड’ लागला, असे शेतकºयाला सांगण्यात आले. त्यामुळे कर्ज वसुलीच्या नोटीस तत्काळ थांबविण्यात यावा, गारपिट किंवा अन्य मदत निधीची मिळालेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यातून परस्पर वळती करू नये, अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेने केली. या मागणीच्या अनुषंगाने केशवनगर येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह पदाधिकाºयांनी निषेध नोंदविला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस; 'स्वाभिमानी'ने नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 3:05 PM