वाशिम नगर परिषदेच्या कर विभागातील अधिकारी व कर्मचारी दरवर्षी कसोशीने प्रयत्न करून कोटी रुपयाच्या जवळपास करवसुली करताहेत. जिल्ह्यातील चारही नगर परिषदेमध्ये वाशिम नगर परिषद करवसुलीत अव्वल असते. मार्च एन्डिंगपर्यंत संपूर्ण वसुलीसाठी प्रयत्न करताना जानेवारी महिन्यापासूनच कर थकीत असलेल्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केल्याने कर थकीत असलेल्यांनी कराचा भरणा करण्यासाठी संबधितांची भेट घेणे सुरू केले असल्याचे कर विभागातील गर्दीवरून दिसून येत आहे. वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी कराचा भरणा करून कारवाई टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली नोटिसा बजाविण्याचे कार्य नगर परिषदेतील कर विभागातील कर निरीक्षकासह कर्मचारी करताना दिसून येत आहेत. लेखा परीक्षण अहवाल, तपासणी अहवालानुसार व शासनाकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची १०० टक्के वसुली करण्याचे निर्देश कार्यालयास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार थकबाकीदार व चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची रक्कम भरण्याकरिता नागरिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसाच्या आत नगर परिषद कार्यालयामध्ये रक्कम न भरल्यास नगर परिषदेच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार कार्यवाही करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार यांनी दिली.
करवसुलीसाठी कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार, साहेबराव उगले, किशोर हडपकर, संतोष किरळकर, नाजिमोद्दीन खैरोद्दीन मुलाजी, शिवाजी इंगळे, कुणाल कनोजे, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मुन्नाखान, वहाबभाईसह करवसुली विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
-------------
वेळेवर कर भरा, स्वत:चे नुकसान टाळा : मुख्याधिकारी दीपक माेरे
शहर स्वच्छ, सुंदर व सर्व सुविधायुक्त हवे असल्यास शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाच्या वतीने शहराच्या विकासासाठीच नागरिकांकडून करवसुली केली जाते. या करवसुलीतूनच शहरात विविध सुविधा पुरविल्या जातात. मात्र काही नागरिक जाणून कर भरण्यास विलंब करतात. कर न भरल्यास यात नुकसान कर न भरणाऱ्यांचे आहे, ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. शासनाच्या नवीन धोरणानुसार थकीत करावर व्याज आकारल्या जात आहे. ते वेळेवर न भरल्यास फार मोठे नुकसान ग्राहकांचे होऊ शकते. त्याकरिता वेळेवर कर भरा, स्वत:चे नुकसान व जप्तीही टाळा, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी नागरिकांना केले आहे.
----------
शहरातील कर थकबाकी असलेल्या नागरिकांना कर भरणा त्वरित करण्यात यावा, यासाठी नाेटीस बजाविण्याची माेहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे.
अ. अजिज अ. सत्तार
कर निरीक्षक, वाशिम नगर परिषद