मालेगाव : शासनाच्या अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थींना यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. मालेगाव तालुक्याची संजय गांधी निराधार समितीची सभा येत्या १२ जुलै रोजी होणार असून, ७ जुलैपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन समिती सदस्य तथा जिल्हा दक्षता समितीचे सदस्य नितिन पाटिल काळे यांनी केले.गोरगरीब, वृद्ध, निराधार, दिव्यांग यांच्यासाठी शासनातर्फे दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी संजय गांधी निराधार समितीतर्फे लाभार्थी निवड केली जाते. यावेळी ही प्रक्रिया आॅनलाईन झाली आहे. बरेच दिवसापासून या समितीची सभा झाली नाही. या प्रक्रियेसाठी सेतु संचालकांची बैठक घेऊन त्यांना प्रक्षिक्षण देण्यात आले. आता लाभार्थींनी आपले अर्ज ७ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आॅनलाईनमुळे बोगस प्रकरणांना आळा बसणार आहे. संबंधित लाभार्थींनी आपली प्रकरणे जवळच्या सेतू केंद्रातच द्यायची असल्यामुळे लाभार्थींचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. लाभार्थींनी दलालापासून सावध राहावे आणि नजीकच्या सेतु केंद्रात आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन काळे यांनी केले.
अर्थसहाय्याच्या योजनांसाठी आता करावे लागणार आॅनलाईन अर्ज !
By admin | Published: July 02, 2017 1:37 PM