मानोरा : बोगस प्रमाणपत्र घेऊन किंवा कोणतीही पदवी न घेता पशूवर उपचार करणाऱ्या व आपल्या नावासमोर डॉ. उपाधी लावणाऱ्या बोगस पशुवैद्यक यांच्यावर आता गुन्हे दाखल होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूरचे निबंधक डॉ. बी. आर. रामटेके यांनी एक आदेश काढला असून सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना पाठविला आहे.
बोगस पदविका प्रमाणपत्रधारकावर, त्याचप्रमाणे पात्रता नसतानाही डॉ. उपाधीचा हेतुपुरस्सर गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर करवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघाटना यांनी केली होती. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कोणत्याही प्रकारे पशुवैद्यक शास्त्राचे ज्ञान प्राप्त न करता जनावरांवर उपचार करून मुक़्या प्राण्याच्या जिवाशी खेळ चालला आहे. निर्धास्तपणे डॉ. ही उपाधी पशुवैद्यक व्यवसाय करीत आहेत. ही अतिशय संतापजनक बाब आहे. म्हणून अशा लोकांना शोधण्याची मोहीम राबवून त्यांचे प्रमाणपत्र जप्त करावे व सत्यता पडताळून संबंधितावर नियमानुसार करवाई करून गुन्हे दाखल करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बोगस पशुवैद्यक व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.