लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील केशरी (एपीएल) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ दिला जाणार आहे. मे व जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी १२ एप्रिल रोजी दिली.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मे व जून महिन्यात अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारतीय खाद्य निगम यांच्याकडून धान्य उचल करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सुरु झाली आहे. तसेच मे महिन्यातील धान्य वितरण पूर्ण झाल्यानंतर जून महिन्याचे धान्य वितरण करण्यात येणार आहे.अन्नधान्य वाटप करतांना रास्तभाव दुकानदारांनी एपीएल (केशरी) शिधापत्रिका क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशीलाची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेणे आवश्यक आहे. तसेच त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेवून त्या ग्राहकास रीतसर पावती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यातील केशरी (एपीएल) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना रेशनचे धान्य दिले जाणार आहे. सर्व रास्तभाव दुकानदारांनी शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना निश्चित केलेले धान्य, निश्चित केलेल्या दरातच वितरीत करावे. अन्नध्यान वितरणातील अनियमितता व दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्य वितरणाबाबत काही तक्रारी अथवा समस्या असतील तर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा.- ऋषिकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम
आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:54 AM