मानोरा : वाशिम जिल्ह्यात्ील २६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि प्रथमच जनतेमधून सरपंचाची निवड करण्यात आली. त्यामधील विविध ठिकाणच्या सरपंच पदावर राजकीय नेते आपली दावेदारी करीत असल्याने सुरू झालेला राजकीय गोंधळ पूर्णपणे थांबला नसतानाच आता उपसरपंच पदावर आपल्या गटाचा उमेदवार कसा विराजमान होईल, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा प्रथमच सरपंच पदाची निवड थेट मतदारांकडून करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाचे तिकिट अथवा चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्या तरी, सरपंच निवडीसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अप्रत्यक्ष प्रयत्न केलेच आहेत. दुसरीकडे आता थेट मतदारांकडून निवडून यायचे असल्याने अनेक उमेदवारांनी अगदी बालकथेमधील ‘आचाने दिला एक घास, माचाने दिला एक घास’ या युक्तीचा अवलंब करताना विविध पक्षाच्या बड्या नेत्यांशी मधूर संबंध ठेवून आपले हित साधून घेतले; परंतु विजयश्री मिळविल्यानंतर आता नेमके श्रेय कोणाला द्यायचे, ही त्यांची पंचाईत झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांची दावेदारी संपलेली नाही; परंतु आता उपसरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असताना या पदावर आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी राजकीय नेते खेळी करीत आहेत. जेवढ्या उपसरपंच पदावर आपल्या गटाचे उमेदवार निवडून येतील तेवढ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला हाताशी घेणेही त्यामुळे शक्य होऊन आपली दावेदारी खरी असल्याचे त्यांना सिद्ध करता येणार आहे. त्यामुळेच उपसरपंच पद बळकावण्यासाठी विरोधी गटाच्या सदस्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे दिसत आहे.