वाशिम : कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला पिरॅमल फाऊंडेशनचे स्वयंसेवक येणार असून, याबाबत पिरॅमल फाऊंडेशच्यावतीने ३० जूनरोजी वाशिम जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. जिल्हयातही ‘सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही’ अभियान राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्यावतीने देशातील ११२ आकांक्षित जिल्हयात ‘सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही’ या अभियानाची सुरुवात आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि पिरॅमल फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पिरॅमल यांच्याहस्ते करण्यात आली. वाशिम जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात करण्यात आला असल्यामुळे लवकरच जिल्हयात या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत पिरॅमल फाऊंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक अमित गोरे, कार्यक्रम प्रमुख कोमल ससाणे व इतर सदस्यांनी ऑनलाईन मिटिंगदवारे वाशिम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. अमोल धंदर, दीपक वाघ, राम श्रृंगारे यांच्याशी संवाद साधला.
जिल्हयातील कोविड-१९ चे सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पिरॅमल फाऊंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येणार असल्याचे विचार कार्यक्रम व्यवस्थापक अमित गोरे यांनी व्यक्त केले.