0000
अरक येथे सहा कोरोनाबाधित
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील सहाजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे ८ मे रोजी निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित केली आहे.
००००००
कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने आरटीपीसीआर व अन्य कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाशिम शहरासह तालुक्यात वाढविले आहे. यांसह व्यापाऱ्यांनीही पुन्हा कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.
००
अनुदान प्रलंबित; शेतकरी त्रस्त
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड, मालेगाव तालुक्यांत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळाले नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली.
००
आत्मा अभियानाची कामे थांबली
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने कृषी विभागाच्या विविध योजना राबविण्यात अडचणी येत आहे. त्यात आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांतील कामे थांबली आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीला विलंब होत आहे.
०००
जनुना येथे तपासणी मोहीम
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य सर्वेक्षण व तपासणी केली जात आहे. शनिवारीदेखील येथे चारजण कोरोना पॉझिटिव्ह आले.
००००
पेट्रोल पंपावर एकच गर्दी (फोटो)
वाशिम : रविवारपासून कडक लॉकडाऊन असल्याने रिसोड, मालेगाव, कारंजा शहरात पेट्रोल भरण्यासाठी शनिवारी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे पेट्रोल भरण्यासाठी एक ते दोन तासांपर्यंत वाहनचालकांना रांगेत राहण्याची वेळ आली.
०००००
कोयाळी येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : रिसोड तालुक्यातील कोयाळी येथे शनिवारी सातजणांचा कोेरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामस्थांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे, तोंडावर मास्क किंवा रुमाल धरावा, गर्दीत जाणे टाळावे, असे मार्गदर्शन आरोग्य विभागाने केले.
०००
जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
वाशिम : लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत उभारणी करण्यात येत असलेल्या उमरी प्रकल्पाकरिता शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे. मोबदला न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला.
००
वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय
वाशिम : गत काही दिवसांपासून वाशिम शहरासह ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शनिवारी दुपारच्या सुुमारास नवीन आययुडीपी भागात असाच प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
०
दलित वस्ती योजनेची कामे अपूर्ण
वाशिम : हराळ, रिठद, अडोळी जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे.