वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० च्या पहिल्याच आठवड्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत जाऊन ७ जानेवारी २०२० पर्यंत ६७४२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. प्रामुख्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोनाचा वाढता प्रकोप आणि त्यामुळे होत असलेले मृत्यू लक्षात घेत शासन, प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या. कोरोना चाचणी तातडीने करण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली, तर माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत १२ लाख लोकांची तपासणी करून बाधितांवर वेळीच उपचार करण्यात आले. त्यामुळे कोरोना संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळाले आहे. त्यात जिल्ह्यात प्रथमच कोरोना संसर्गातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कोरोना बळींच्या संख्येखाली आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १०३ कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत.
----------
आठवडभरात ७९ व्यक्तींना संसर्ग
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला चांगलेच यश येत असल्याचे आठवडाभरातील रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे. नववर्षात १ ते ७ जानेवारीदरम्यान केवळ ७९ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
--------------------
आठवडाभरात ११८ व्यक्तींची कोरोनावर मात
वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असतानाच कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यात नववर्षात ७९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असताना ११८ बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
----------
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह - ६७४२
अॅक्टिव्ह - १०३
डिस्चार्ज - ६४८८
मृत्यू - १५०