लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ३० जुलै रोजी स्पष्ट झाले. आता एकूण रुग्णसंख्या ५८४ झाली आहे. दरम्यान, अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा दर चढता असून, यामध्ये १९ जणांची भर पडली. बुधवारी दुपारी १२ वाजता प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात आणखी ११ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये मानोरा शहरातील रहिमानिया कॉलनी परिसरातील २, तहसील कार्यालयानजीकच्या परिसरातील १, विळेगाव (ता. मानोरा) येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील ३, वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १ आणि कळंबा महाली येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.सायंकाळी ७.३० वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. यामध्ये मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील १, इराळा येथील ३ व कारंजा लाड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १ व मंगरूळपीर शहरातील टेकडीपुरा परिसरातील १ व लाठी (ता. मंगरूळपीर) येथील २ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५८४ झाली आहे. यापैकी २०८ रुग्ण अॅक्टिव्ह (सक्रिय) आहेत. गुरूवारी १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सील केला असून, आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली.
१६ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १६ व्यक्तींना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये रिसोड तालुक्यातील १०, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १ व साईलीला नगर येथील १, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील २ व आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि कारंजा लाड शहरातील नगरपालिका परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
एका रुग्णाचा अकोल्यात मृत्यूजिल्ह्यात मृत्यूच्या संख्येतही हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येते. अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका रुग्णाचा गुरूवार, ३० जुलै रोजी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली.