वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे निदान ३ एप्रिल २०२० रोजी झाल्याने जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. त्यानंतर एप्रिल ते जुलै २०२० पर्यंत कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रित होते; परंतु जुलैपासून कोरोना संसर्गाने वेग घेतला. दरम्यान, २ मे २०२० रोजीच जिल्ह्यात पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली. त्यानंतर २३ मार्च २०२१ पर्यंत जिल्ह्यात १३ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ११ हजारांहून अधिक व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर १७४ जणांचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात डिसेंबर २०२० पर्यंत ६६६३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला होता, तर नव्या वर्षात १ जानेवारी ते २३ मार्चपर्यंतच त्यात आणखी साडेसहा हजार व्यक्तींची भर पडली. अर्थात, २०२१ मधील बाधितांचे प्रमाण २०२०च्या तुलनेत तिपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा प्रवास
महिनानिहाय वाढलेले रुग्ण आणि मृत्यू
२०२० मृत्यू बाधित-
एप्रिल ०० - ०१
मे ०२ - ०७
जून ०० - ८८
जुलै १० - ४८८
ऑगस्ट १९ - ११६९
सप्टेंबर ६० - ३०७८
ऑक्टोबर ५२ - २७२
नोव्हेंबर ०५ - १०६३
डिसेंबर ०० - ४९७
========================
२०२१
जानेवारी ०६ - ४८१
फेब्रुवारी ०६ - १७९०
मार्च २२ १४ - ४२६६
^^^^^^^^
२ मे रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना बळी
वाशिम : मुंबई येथून नागपूरकडे जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका ट्रक क्लिनरला मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे अस्वस्थ वाटल्याने २ मे रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. त्याचा थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल ४ मे रोजी सकाळी प्राप्त झाला. त्यात तो पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
-------------------
शंभरवर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात
वाशिम : रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये १ मार्च २०२१ रोजी भिकाजी आयाजी मोरे यांना कोरोना संक्रमण झाल्याने दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न करीत मोरे यांच्यावर उपचार केले. यानंतर १२ मार्चला त्यांना सुटी देण्यात आली. वेळेत उपचार केल्यास कोरोनावर मात करता येते, हे रिसोड तालुक्यातील घोटा येथील शंभरवर्षीय आजोबांनी सिद्ध करून दाखविले.