लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून ऑनलाइन वर्ग भरविले जात आहेत. या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नसताना शिक्षण शुल्क मात्र वारेमाप भरावे लागत असल्याने अनेक पाल्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश जि.प. शाळेत केले आहेत. त्यामुळे जि.प. शाळांच्या पटसंख्येत यंदा जवळपास दिड हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४० शाळा आहेत. गत काही वर्षांत खासगी शाळांत पाल्यांचे प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढला होता. त्यामुळे जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली होती. जिल्ह्यातील २० शाळांत, तर २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने या शाळा बंद करण्याची पाळी आली होती, तर शिक्षकांची पदेही अतिरिक्त ठरू लागल्याने जि.प. शाळांचे भवितव्यच अंधारात सापडले होते. दरम्यान, गतवर्षीपासून जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले. वाशिम जिल्हाही यातून सुटला नाही. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या जिवाचा विचार करता शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने दिला. तेव्हापासून खासगी शाळांचेही वर्ग बंदच आहेत. ऑनलाइन शिक्षण असतानाही खासगी शाळांकडून वारेमाप शुल्क वसूल केले जात आहेच शिवाय स्मार्ट फोन आणि महिन्याच्या इंटरनेटचा खर्चही वाढला आहे. त्यात ग्रामीण भागांत इंटरनेटची विस्कळीत सेवा आदी कारणांमुळे शेकडो पालकांनी त्यांच्या पाल्यांचे जि.प. शाळांत नाव दाखल करणेच पसंत केले. त्यामुळे जि.प. शाळांच्या पटसंख्येत जवळपास दिड हजारांची वाढ झाली आहे.
कोरोना काळात दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. जि.प. शिक्षण विभागाने या काळात वेगवेगळे पर्याय शोधून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात प्रभावी कामगिरी केली. शिवाय शैक्षणिक योजनांची अंमलबजावणीही व्यवस्थित झाली. त्यामुळे यंदा जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढत असल्याचे आजवरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.-गजाननराव डाबेराव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम