लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोषण अभियानांतर्गत वाशिम तालुक्यातील ९० गावांत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रात पोषण अभियानासंदर्भात सार्वत्रिक शपथ घेण्यात आली.बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पोषण अभियान हाती घेण्यात आले आहे. पोषण अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांचा आढावा घेत योग्य त्या सूचना दिल्या. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी ३० सप्टेंबरपर्यंत राबवावयाच्या कार्यक्रम व उपक्रमांची रुपरेषा निश्चित केली असून, त्या अनुषंगाने १८ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यातील ९० गावांत सदर अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रभातफेरी, रॅली काढण्यात आली तसेच पोषण अभियानाची शपथ घेण्यात आली. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार व सुदृढ शरीर, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आदींना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती, मार्गदर्शन केले जाणार आहे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, विस्तार अधिकारी मदन नायक, जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले.
पोषण अभियान : वाशिम तालुक्यातील ९० गावांत सार्वत्रिक शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:01 PM