लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनसह परिसरातील शाळांत पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील १५ दिवसांपासून शाळांतील पोषण आहार बंद होता. या संदर्भात लोकमतने ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शाळांत पोषण आहारासाठी तांदूळ, तसेच इतर साहित्य उपलब्ध केले. त्यामुळे शाळांतील पोषण आहार वितरण पुन्हा सुरू झाले.शिरपूर परिसरातील शाळांना पोषण आहार पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत असल्याचे चित्र शिरपूर व परिसरातील शाळांमध्ये दिसून येत होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन मध्यान्ह भोजनाकरिता पोषण आहार पुरवित असते. मात्र, मागील १५ दिवसांपासून शिरपूर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी शिजलीच नाही. प्रत्यक्षात पोषण आहारातील खिचडी शिजविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ आणि इतर साहित्य शाळांत उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिक्षकवर्गही अडचणी सापडले आणि शाळांतील पोषण आहार वितरण ठप्प झाले. दोन महिन्यांपूर्वीही शिरपूर परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील बरेच दिवस शालेय विद्यार्थी दुपारच्या पोषण आहारापासून वंचित राहिले होते. पुन्हा हा प्रकार गत १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यातच दर शुक्रवारी राबविण्यात येणाºया बिस्किट वाटपाचा कार्यक्रमही बारगळल्याने बिस्कीट मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. लोकमतने या संदर्भात ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले. त्याची तात्काळ दखल घेऊन शिरपूर परिसरातील शाळांत पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या शाळांत पुन्हा पोषण आहारातील खिचडी शिजू लागली असून, शाळेतील चिमुकल्यांना त्याचा आधार झाला आहे.
शिरपूर परिसरातील शाळांत पोषण आहार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 2:34 PM