वाशिम : राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. यंदाही कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी पोषण महोत्सवास प्रारंभ झाला.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात या महोत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती इत्यादी ठिकाणी सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करून पोषण वाटिका तयार करणे, परसबाग तयार करणे याबाबत जनजागृती करणे, गर्भवती महिलांसाठी पोषण आहाराबाबत घोषवाक्य तयार करण्यासाठी स्पर्धा घेणे, मातृत्व वंदन सप्ताह साजरा करणे तसेच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे १०० टक्के कोविड लसीकरण, गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी कोविड लसीकरण, ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने तपासणी व समुपदेशन, तिसऱ्या तिमाहीत गरोदर महिलांसाठी स्तनपानविषयक समुपदेशन, पोषण आहार व लोह याबाबत समुपदेशन तसेच अंगणवाडी केंद्रातील बालके आणि किशोरवयीन मुली यांचे आरोग्य पोषण यांच्या दृष्टीने योगाचे प्रशिक्षण नियोजन करण्यात आलेले आहे. कारंजा तालुक्यात उंबर्डाबाजार येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ३० सप्टेंबरपर्यंत गावस्तरावर अंगणवाडी स्तरावर उपकेंद्र स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियोजनानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले.
०००००००००००
कुपोषित बालकांची शोधमोहीम
सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये सॅम बालकांना शोधून पोषण आहाराचे वाटप करणे, कुपोषित बालकांची शोधमोहीम, संदर्भसेवा, वाडी वस्तीवरील तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे व याबाबत जनजागृती करणे तसेच ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ या अनुषंगाने कोविडसदृश लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी केली जाणार आहे. सर्व केंद्रांवरील नियोजित कार्यक्रम हे कोरोनाचे नियम पाळून घेण्यात येतील, असे मदन नायक यांनी सांगितले.