जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना मास्कचा वापर करावा, ट्रिपल सीट प्रवास करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. अनेक जण विनाकारण वाहन चालवितात तसेच वाहतूक नियम पाळत नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मालेगाव वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, परवाना नसणे, मास्क नसणे, ट्रिपल सीट आदी कारणांवरून जून महिन्यात ७०० वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वात जमादार पंजाबराव पवार, पोलीस कर्मचारी मनोहर वानखडे यांनी पार पाडली. वाहनचालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या.
००
मास्क नसल्याप्रकरणी दीड लाखाचा दंड
जून महिन्यात मालेगाव वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम न पाळणाऱ्या ७०० जणांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ३०० जणांनी मास्कचा वापर न केल्याप्रकरणी दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरित कारवायांमध्ये ट्रिपल सीट, परवाना नसणे, फॅन्सी नंबर, कागदपत्रे सोबत नसणे, अवजड वाहतूक आदींचा समावेश आहे.