मंगरूळपीर : शासनाने ‘नाफेड’मार्फत हमीदराने सुरू असलेली तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, ‘नाफेड’च्या या धोरणाचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवार, २६ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन केले; तर शेतकऱ्यांनी तूर जाळून या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.मंगरुळपीर येथे ‘नाफेड’ने तूर खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने रास्ता रोको केला. ‘नाफेड’ची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यावर आपला माल रस्त्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. याकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. बळीराजाला मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मोफत भोजनदानाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. शेवटी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मंगरुळपीर येथील अकोला चौक येथे बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या विरोधात रास्ता रोको करुन तथा तूर जाळून निषेध करण्यात आला. आजच्या आंदोलनात अनंता काळे, विठ्ठलराव गावंडे, पुंडलिकराव ठाकरे, भास्कर पाटील, उमेश गावंडे, संजय भोयर, आनंद राऊत, शंकरराव सावके, अशोक खराबे, रवी राऊत, अशोक बायस्कर, मारोतराव चौधरी, अमोल पाटील, लईक अहेमद, विजय सावके, देवराव धाने, साजिद खान, युनूस खान, विष्णू चव्हाण, आनंदा ढगे, जयराम धोटे, दिलीप मोहिते, सचिन रोकडे, निंबाजी भेंडेकर यांच्यासह शेकडो शेतकरी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील अकोला चौकातील वाशिम, कारंजा, अकोला हा रस्ता तासभर जाम झाला होता.
शासकीय कामात अडथळा; ३० जणांविरूद्ध गुन्हा!
By admin | Published: April 27, 2017 1:04 AM