लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आयोजित ओंकारगिर बाबा पुण्यतिथी सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून हजारो भाविक शिरपूर येथे दाखल झाले होते. या सोहळ्याचा समारोप रविवार १६ जुलै रोजी भक्तीमय वातावरणात करण्यात आला.शिरपूर जैन येथील समर्थ जानगीर महाराज संस्थानवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ओंकारगिर बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार ९ जुलैपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवार १६ जुलै रोजी या सोहळ्याच्या समाप्तीनिमित्त ५१ दिंड्यांच्या सहभागाने गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेऊन ओंकारगिर बाबांच्या पालखीचे दर्शन घेतले. परंपरेनुसार या पालखीचे मिर्झा मिया बाबा यांच्या दर्गाहमध्ये पुजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करून सोहळ्याचा समारोप करण्यात आला. महाप्रसादासाठी ११ क्विंटलची बुंदी, ५१ क्विंटल गव्हाच पोळ्याा व ३१ क्विंटल काशी फळाची भाजी बनविण्यात आली होती. या कार्यक्रमाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.