महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जातो; मात्र गत काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तीव्र झाल्याने खबरदारी म्हणून इतर सार्वजनिक कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांवरही प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीला महाप्रसादाचा नैवेद्य सर्वप्रथम हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहला अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती जानगीर महाराज संस्थानने यंदाही कायम राखली. ११ मार्च रोजी दुपारी संस्थानचे मुकुंद चोपडे, प्रशांत देशमुख, संतोष गौर, ओंकार चोपडे व अन्य दोघांनी हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहमध्ये जाऊन विधीवत नैवेद्य अर्पण केला. दरवर्षी महाप्रसादाचा ७५ हजारांहून अधिक भाविक लाभ घेतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द ठेवण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त संस्थानमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थान व प्रशासनातर्फे पूर्वीच करण्यात आले होते. त्यानुषंगाने महेशगीर बाबा यांच्या मार्गदर्शनात संस्थानचे कर्मचारी व पोलीस प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर असल्याचे दिसून आले.